सेलू (परभणी ) : तालुक्यातील वालूर येथील एका पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी गल्ल्यातील रोख रकम व तीन मोबाईल असा १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारच्या मध्यरात्री घडली. दरम्यान, या प्रकरणी सेलू पोलिसांनी पाच संशियातांना पाच ताब्यात घेतले आहे.
वालूर येथे शैलेश सुरेंद्र तोष्णीवाल यांचा सेलू-वालूर रस्त्यावर पेट्रोलपंप आहे. सोमवारी मध्यरात्री दोन चोरटे तोंडावर कपडा बांधून पेट्रोलपंपाच्या कॅबीनमध्ये दाखल झाले. पंपाचे व्यवस्थापक चिनके यांच्या गळ्याला त्यांनी चाकू लावला. दुसरा कामगार मोहनच्या गळ्याला दोरीने बांधले. त्यानंतर चोरट्यांनी मोहन काजळे याच्या गल्ल्यातून ५० हजार तर पंपाचे दुसरे कामगार ज्ञानेश्वर मगर यांच्या गल्ल्यातील ४५ हजार रुपये घेतले. तसेच दोन्ही कामगार व पंपाच्या कॅबीनमध्ये झोपण्यासाठी आलेला कामगारांचा मित्र हरिष पांढरे या तिघांचे मोबाईलही चोरट्यांनी लांबविले. चोरट्यांनी पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेराही फोडून सोबत नेला.
पंपाचे मालक तोष्णीवाल यांच्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी भेट दिली. या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.