- प्रसाद आर्वीकर ( परभणी )
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने औषधी वनस्पती आणि मसाला पिके सुकविण्यासाठी रॉकबेड ड्रायर हे संयंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेवर हे यंत्र असून, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. राहुल रामटेके, प्रा. डॉ. स्मिता सोळंकी यांनी संयंत्राची माहिती दिली.
रॉकबेड सौर ड्रायरचे तीन मुख्य भाग आहेत. त्यात सौर संकलन, हवाबंद काचेचे आवरण आणि स्टँडचा समावेश आहे. सौर संकलक हा महत्त्वाचा भाग असून, यामध्ये सौरऊर्जेचा वापर करून हवा गरम केली जाते. या गरम हवेचा उपयोग ट्रेमध्ये ठेवलेले पदार्थ सुकविण्यासाठी केला जातो. २२ गेज जीआयच्या पत्र्यांपासून सौर संकलक बनविलेले आहे. त्यामध्ये ४-५ मि. मी. आकाराचे खडकाचे तुकडे ठेवलेले असतात. तसेच जास्तीत जास्त उष्णता शोषली जावी म्हणून या तुकड्यांना काळा रंग दिला जातो. संकलकाच्या पेटीच्या वरच्या बाजूला ४ मि. मी.जाडीचे काचेचे आवरण असते व वातावरणातील नैसर्गिक हवा खडकामधून आत येण्यासाठी खालच्या समोरील बाजूस सछिद्र द्वार सोडलेले आहे.
सौर संकलकाला जोडूनच ट्रे ठेवण्यासाठी जीआय पत्र्याचे कॅबिनेट बसविलेले आहे. यात सूर्यकिरणे संकलकामधील काळ्या रंगाच्या तुकड्यांमध्ये शोषली जातात आणि संकलकामधील उष्णतामान वाढते. या संयंत्रात सुकलेल्या पदार्थांवर प्रत्यक्ष सूर्यकिरणे न पडता अप्रत्यक्षरीत्या गरम हवेचा वापर करून पदार्थ सुकविला जातो. त्यामुळे रंग व स्वाद टिकून राहतो, उच्च गुणवत्तेच्या पदार्थांची निर्मिती होते. या ड्रायरचा उपयोग औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, भाजीपाला व फळे सुकविण्यासाठी उपयोग केला जातो.