परभणी : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सतत अतिवृष्टी होत असून दीडशे कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान होत असताना, प्रशासनाकडून मात्र मदतीसाठी हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच पडत आहे.
हवामानात बदल होऊन दरवर्षी जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. कधी खरीप हंगामात, तर कधी रब्बी हंगामात ढगफुटीसारखा पाऊस होऊन शेतीपिके आणि रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे. मागीलवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर यावर्षीही जुलै तसेच सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने जिल्ह्याला फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत निधीची मागणी केली जाते; परंतु प्रत्यक्षात तुटपुंजी मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होऊनही मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
परभणी, पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जुलै महिन्यात परभणी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सप्टेंबर महिन्यात पालम तालुक्यात पावसाने हाहाकार उडविला. जुलै महिन्यातील नुकसानीपोटी प्रशासनाने ४५ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी केली आहे, तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण केलेले नाहीत.
सरकार बदलले, परिस्थिती काय?
अतिवृष्टीने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार निधीची मागणी केली जाते. मागील सरकारच्या काळातही रस्त्यांसाठी निधी मागितला होता. तोही मिळाला नाही. यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पुलांच्या दुरुस्तीसाठी २६ कोटी ९१ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे; परंतु अद्यापपर्यंत ही रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली नाही.
गतवर्षी १०८ कोटी मिळाले
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई दिली जाते. २०२० मध्ये जिल्ह्याला १०८ कोटी १५ लाख ८५ हजार रुपयांची मदत मिळाली होती. यावर्षीच्या ४४ कोटी ५४ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा कायम आहे.