मानवत : तालुक्यातील ७१ शाळांमधील ६ हजार ३४१ विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या खात्यावर प्रत्येकी एक गणवेश खरेदीसाठी १९ लाख रुपयांचे अनुदान शासनाच्यावतीने वर्ग करण्यात आले आहे.
कोरोनामुळे जूनपासून प्रत्यक्ष शाळा सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे २०२०-२०२१ हे शैक्षणिक वर्ग ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. शिवाय राज्य शासनाने अनेक योजनांना कात्री लागून यासाठीचा निधी कोरोनावरील उपाययोजनांसाठी वापरला होता. आता मात्र शासनाने टप्प्याटप्प्याने विविध योजनांसाठी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेशासाठी निधी देण्यात येतो. गतवर्षी मानवत तालुक्यातील ७१ शाळांमधील ६ हजार २५० विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याकरिता शासनाने ३७ लाख ८ हजार २०० रुपयांचा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला वितरित केला होता. यावर्षी मात्र प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या नसल्याने एकाच गणवेशासाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार ५० टक्केच निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार १९ लाख २ हजार ३०० रुपयांचे अनुदान संबंधित शाळांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसाठीचे गणवेश खरेदीही केले आहेत.
एका विद्यार्थ्यासाठी ६०० रुपयांची तरतूद
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या समग्र शिक्षण विभागाकडून हा निधी विद्यार्थ्यांना देण्यात येतो. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता ६०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनामुळे निधी कपातीचे धोरण अवलंबिले गेल्याने ३०० रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
नांदेडहून गणवेश खरेदीचा घाट
प्रत्येक शिक्षण समितीने विद्यार्थ्यांच्या गणवेश संदर्भात निर्णय घेणे अपेक्षित असताना जिल्हा परिषदेतून नांदेड येथील विशिष्ट दुकानदारांकडून हे गणवेश खरेदी करण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा शिक्षकांमधून सुरु आहे. या संदर्भात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोनपेठ तालुक्यातील काही नागरिकांनी तक्रारीही केल्या ; परंतु, त्यांनी या प्रकरणी कुठलीही कारवाई केलेली नाही.