पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अमलात आणली. या योजनेंतर्गत २०१८ पासून ते २०२० या दोन वर्षांत जवळपास ९०० हेक्टरवर फळबागेची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळबागाची लागवड केली आहे. त्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी कृषी विभागाकडे पैसा उपलब्ध नाही.
कृषी विभागाने २०१८-१९ या आर्थिक वर्षात २४ लाख ८९ हजार, २०१९-२० मध्ये ३ कोटी ४० लाख असे एकूण ३ कोटी ६५ लाख ३६ हजार रुपयांची मागणी नोंदविली होती. त्यापैकी केवळ आतापर्यंत १ कोटी रुपयांपर्यंतचा निधी कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे अद्यापही कृषी विभागाला या फळबाग लागवड योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी २ कोटी रुपयांची गरज आहे.