येथील जिजामाता रोड भागातील अजय रामदास हुडके यांचे एसबीआयचे क्रेडिट कार्ड बंद पडले होते. ११ ऑगस्ट रोजी अजय हुडके यांना क्रेडिट कार्ड बंद पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याच दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना क्रेडिट कार्ड बंद पडल्याची माहिती दिली. मात्र त्याच दिवशी एसबीआय कस्टमर केअरमधून बोलतो, असा बनाव करीत एक फोन अजय हुडके यांना आला. तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले आहे, तेव्हा 'प्रोसेस' असा मेसेज एका क्रमांकावर पाठविण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार संबंधित क्रमांकावर मेसेज पाठविल्यानंतर अजय यांना एक ओटीपी क्रमांक प्राप्त झाला. लगेच संबंधित व्यक्तीने पुन्हा त्यांना फोन करून ओटीपी क्रमांक विचारला. अजय यांनी ओटीपी क्रमांक दिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातील ३४ हजार ३०७ रुपये काढल्याचा संदेश अजय यांच्या मोबाईलवर आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अजय हुडके यांनी २ सप्टेंबर रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे तपास करीत आहेत. मोबीक्विक या ॲपच्या सहाय्याने हे पैसे चोरट्याने परस्पर लांबविल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बँक खात्यातील ३४ हजार रुपये परस्पर लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:22 AM