परभणी : पालम तालुक्यातील ९६० शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासणीला प्रारंभ झाला असून, ९ केंद्रांवर तपासणी केली जात आहे. येत्या दोन दिवसांत तपासणी पूर्ण होणार असल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली १ जानेवारी रोजी पालम तालुक्यातील सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आरटीपीसीआरच्या अनुषंगाने टाकसाळे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत चार केंद्रांवर तपासणी पूर्ण झाली असून, मंगळवारपर्यंत सर्व शिक्षकांची तपासणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शौचालय सुरू करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गंगाधर यंबडवार, गट विकास अधिकारी आर.व्ही. चकोर, गट शिक्षणाधिकारी बी.डी. ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीरस, सीडीपीओ आर.बी. इरमे आदींची उपस्थिती होती. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश टाकसाळे यांनी घरकूल, पाणीपुरवठा विभाग, एमआरईजीएस, कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग महिला व बालकल्याण विभाग आदी विभाग प्रमुखांना दिले.