पालम : तालुक्यातील बनवस येथील 100 घरात धोंड नदीच्या पुराचे पाणी शिरले असून गावचा संपर्क देखील तुटला आहे. या गावात पुराच्या पाण्याने हाहाकार माजला असून अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. घरासमोरील काही मोटरसायकली वाहून गेल्याने नुकसानीत मोठी वाढ झाली आहे.
बनवस येथे 7 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी व सांडपाणी गावाजवळून एक खंदक करून धोंड नदीत सोडण्यात आले आहे. परंतु धोंड नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे गावातील खंडकाद्वारे जाणारे पाणी नदी स्वीकारत नाही. त्यामुळे या खंदकात बॅक वॉटर तयार होऊन उताराच्या दिशेने हे पाणी गावात शिरले. ते जवळपास 100 घरात शिरले असून काही घरे देखील पडली आहेत. संसारोपयोगी साहित्याची नासधूस झाली असून या कुटुंबाच्या चुली दुपारपासून पेटलेल्या नाहीत. अन्नधान्य, कागदपत्रे, कपडेदेखील भिजून कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतातील आखाड्याना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अद्यापही पुराचे पाणी ओसरले नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता आले नाही. म्हणून येथील नुकसानही समोर आलेले नाही. गावातील अंगणवाडी व मंदिरातही पाणी शिरले आहे. तरीही पालम तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एकाही कर्मचाऱ्यांनी येथे धाव घेतलेली नाही.
हेही वाचा - - आता गौताळा घाटात दरड कोसळली;कन्नड-नागद मार्गावरील वाहतूक विस्कळीत- video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले- Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव