लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना काळात परराज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी जिल्ह्यातील चार बस आगारांमधून ११२ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. या बसेसवर सेवा बजावलेल्या चालक-वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, चालक-वाहकांना हा भत्ता अद्यापही मिळालेला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे परराज्यातील नागरिकांच्या हाताला काम उरले नाही. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात असलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडण्यासाठी विशेष एस. टी. बसची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली होती. या बसेसवर सेवा देणाऱ्या चालक व वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटला तरी अद्यापपर्यंत ११२ चालक व ४० वाहक अशा एकूण १५२ कर्मचाऱ्यांना हा प्रोत्साहनपर भत्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या चालक व वाहकांना लेखी परिपत्रक काढूनही हक्काचा प्रोत्साहनपर भत्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे एस. टी. कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सर्वाधिक परभणी आगारातून बससेवा
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाथरी, जिंतूर, गंगाखेड व परभणी या आगारांतून एकूण ११२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक परभणी आगारातून ५०, जिंतूर आगारातून १३, गंगाखेड आगारातून २२ तर पाथरी आगारातून २७ बसफेऱ्या मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांच्या सीमेपर्यंत परराज्यातील नागरिकांसाठी सोडण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी चालक व वाहकांनी सर्वतोपरी काळजी घेतली होती.
कोरोना महामारीत जीव धोक्यात घालून चार आगारांतून जवळपास दीडशे कर्मचाऱ्यांनी परराज्यातील नागरिकांना सोडण्यासाठी सेवा बजावली. मात्र, यासाठी मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केलेला प्रोत्साहनपर भत्ता अद्यापही देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
- गोविंद वैद्य
सचिव, महाराष्ट्र कामगार संघटना
एस. टी. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात दोन परिपत्रक काढण्यात आली आहेत. त्यामुळे या संदर्भात असलेल्या शंका दूर करण्यासाठी मार्गदर्शन मागवले आहे. त्यामुळे लवकरच तोडगा काढून या प्रोत्साहनपर भत्त्याचे वाटप होईल.
- मुक्तेश्वर जोशी
विभागीय नियंत्रक , परभणी