- विठ्ठल भिसे/ मोहन बोराडे
पाथरी / सेलू (जि़ परभणी) : श्री साईबाबा यांचा पाथरी येथील भुसारी कुटुंबात जन्म झाल्यानंतर त्यांचे आध्यात्मिक शिक्षण त्यांचे गुरू गोपाळराव देशमुख ऊर्फ केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलूजवळील उंबरखेड येथील मालकीच्या किल्ल्यात झाले. हा स्पष्ट उल्लेख दासगणू महाराज यांनी १९३६ मध्ये केलेल्या अनुभव कथनात नमूद आहे.
साईबाबांची जन्मभूमी पाथरीच, पाथरीकरांचा दावा
श्री साईबाबा यांचे जन्मस्थान पाथरीच असल्याचे जवळपास २९ पुरावे सद्य:स्थितीमध्ये उपलब्ध आहेत. श्री साईबाबा यांच्या सहवासात आलेले नांदेड येथील श्री संत दासगणू महाराज ऊर्फ गणपत दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी १९३६ मध्ये आपले अनुभव कथन केले. सेलू येथील श्री साईभक्त घनश्याम सांगतानी यांनी त्यांच्या ‘विभूती’ या पुस्तकात तशी माहिती नोंदविली आहे. त्या माहितीनुसार श्री साईबाबा हे त्यांचे गुरु गोपाळराव देशमुख ऊर्फ केशवराज बाबासाहेब महाराज ऊर्फ व्यंकुजी यांना सेलू येथे भेटले व त्यानंतर त्यांनी केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलूपासून ३० कि.मी.अंतरावर असलेल्या व सध्या जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील उंबरखेड येथील मालकी हक्काच्या किल्ल्यात आध्यात्मिक शिक्षण घेतले. सदरील किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर श्री व्यंकटेश प्रसन्न असे लिहिले आहे. किल्ल्यात ठेवण्यात आलेल्या तोफेवरही साईबाबा नेहमी उल्लेख करीत असलेला ‘व्यंकुजी’ हा शब्द कोरलेला आहे. ‘१९०३ मध्ये ‘श्री संत अमृत’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. साईबाबांनी या प्रयत्नास आशीर्वाद दिले. या ग्रंथातील काही भाग त्यांना वाचून दाखविण्यात आला किंवा नाही, या संबंधी माहिती देण्यासाठी बाबांना विचारले त्यावेळी त्यांनी जे काही सांगितले, ते मी टिपून ठेवले. सेलूविषयी त्यांनी जे काही सांगितले, त्याविषयी सेलू गावी जावून मी चौकशी केली. प्रत्येक भाग बाबांच्या हाती देताच, ठीक आहे, असे ते म्हणाले. बाबांना लिहिता वाचता किंवा सही करता येत होती की नाही, हे माहीत नाही’, असे दासगणू महाराज यांच्या अनुभव कथनात नमूद करण्यात आले आहे.
भुसारी कुटुंबात जन्म; संस्थानकडे वंशावळ उपलब्धसाईबाबांचा जन्म पाथरी येथील भुसारी कुटुंबात झाला. याबाबत येथील श्री साईबाबा संस्थानकडे त्यांची वंशावळ उपलब्ध आहे. त्या आधारे परशूराम भुसारी हे साईबाबांचे वडील होते. त्यांना पाच मुले होती. त्यात सर्वात मोठा मुलगा रघुपती, त्यानंतर दादा, त्यानंतर हरिभाऊ अर्थातच श्री साईबाबा, त्यानंतर अंबादास व सर्वात लहान बलवंत अशी पाच मुले होती. पाच भावंडांमधील ज्येष्ठ रघुपती यांना महारुद्र व परशूराम अशी दोन मुले होती. महारुद्र यांचा मुलगा रघुनाथ आणि रघुनाथ यांना दिवाकर आणि शशिकांत ही दोन मुले व एक मुलगी होती. त्यापैकी दिवाकर हे हैदराबादला तर शशिकांत हे निजामाबादला स्थायीक झाले. मुलगी नागपूर येथे स्थायीक झाल्याचे त्यांचे वंशज तथा सध्याचे पाथरी येथील श्री साई संस्थानचे विश्वस्त संजय भुसारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
भक्तांची पाथरीत गर्दीया वादामुळे देशातील मीडियात पाथरी शहर गाजत आहे. त्यामुळे पाथरीतही भाविकांची गर्दी वाढत आहे. रविवारी सकाळपासूनच भाविकांची पाथरीत झुंबड उडाली होती.