परभणी : एका खाजगी संस्थेत शिक्षक अनुपस्थित असतानाही त्यांच्या नावे पगार काढल्याच्या तक्रारीवरुन येथील तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह एका शिक्षण संस्थेतील स्वयंघोषित मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांच्या विरोधात २० जून रोजी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील कामेल एज्युकेशन सोसायटीतील हे प्रकरण आहे. या संस्थेचे सचिव मोहम्मद मुश्ताक अहमद मोहम्मद अली शाह यांनी कोतवाली पोलिसांकडे ही तक्रार दिली आहे. मार्च २०१९ ते जून २०२० या काळातील हा सर्व प्रकार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खोटे बिल तयार करुन पैसे उचलत शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कामेल एज्युकेशन सोसायटी ही शासन नोंदणीकृत संस्था असनू, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाव्हुळ आणि तत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी संस्थेतील मुख्याध्यापकाला असलेले शासकीयचे अधिकार काढून शाळेत अनुपस्थित असलेले शिक्षक खानम खानी शहनाज बानो व सिद्दीकी मोहम्मद इरफान मोहम्मद यांना पगार काढण्यासाठी लागणाऱ्या स्वाक्षरीचे अधिकार दिले. त्यानंतर खानम खानी शहनाज बानो या स्वयंघोषित मुख्याध्यापक म्हणून काम करु लागल्या. त्यातूनच दोन्ही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटे दस्त आणि शिक्के तयार करुन शासनाच्या ‘नो वर्क नो पेमेंट’ या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. त्यातूनच शाळेत अनुपस्थित असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार देऊन ७४ लाख ९० हजार ४९८ रुपयांच्या शासन निधीचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कामेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव मो.मुश्ताक अहमद मो. अली शहा यांनी दिलेल्या या तक्रारीवरुन तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाव्हुळ, तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.सुचिता पाटेकर यांच्यासह स्वयंघोषित मुख्याध्यापक खानम खानी शहनाज बानो, सहशिक्षक सिद्दीकी मोहम्मद शरफोद्दीन मोहम्मद आणि शबाना बेगम खुर्शिद अली यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर तुरनर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.