सेलू (जि. परभणी) : अवैधरित्या विक्रीसाठी गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरात गुटखा अवैधरित्या पुरवठा केला जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली. पोलिस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलिस हवालदार विलास सातपुते, रविकुमार जाधव, पो.ना. मधुकर ढवळे यांच्या पथकाने मंगळवारी गणेश नगर भागात सापळा लावला. येथील श्रीकृष्ण किराणा दुकान समोर कार(क्रमांक. एम.एच.१२, डी. ई. ८४९१) येऊन थांबताच पोलिसांंनी छापा टाकला. यात सुदर्शन बाबासाहेब शेरे (रा.सेलू) याच्याकडून बंदी घातलेला गुटखा पान मसाला व ५ लाखांच्या वाहनासह ५३ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर हा गुटखा हा दीपक बोराडे (रा.मंठा) यांचेकडून आणल्याचे पुढे आले. याप्रकरणी पोह. विलास सातपुते यांचे फिर्यादीवरून दोघांविरूद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय कांबळे तपास करीत आहेत.