परभणी : गावाशेजारच्या ओढ्याला पूर आल्याने ( Flood In Parabhani ) तराफ्याच्या साह्याने पूर पार करून २ कि.मी. अंतरावरून ‘लोकमत’चे ( Lokmat ) अंक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे धाडसी काम गंगाखेड तालुक्यातील खळी येथील वितरक प्रदीप गौरशेटे यांनी बुधवारी केले आहे. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खळी हे ४ हजार लोकसंख्येचे गोदावरी नदी काठावरील गाव आहे. गोदावरी नदीला पूर आला की या पुराच्या बॅक वॉटरचे पाणी खळी गावाच्या बाजूला असलेल्या ओढ्यात येते. परिणामी ओढ्याला पूर येतो. त्यामुळे खळी गाव ते गंगाखेड शहराचा संपर्क तुटतो. ही गेल्या अनेक वर्षांपासून खळी ग्रामस्थांसाठी नित्याची बाब आहे. २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. शिवाय गोदावरी नदी परिक्षेत्रातही अतिवृष्टी झाली. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने पुन्हा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला. त्यामुळे गावातील दळणवळण ठप्प झाले.
या परिस्थितही गावातील वाचकांशी असलेली बांधिलकी जपत खळी येथील ‘लोकमत’चे वितरक प्रदीप त्र्यंबकअप्पा गौरशेट्टे यांनी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता नावेच्या साह्याने ओढ्यावरील पूर पार करून पुढे २ किमीचे अंतर चालत जाऊन गंगाखेड रस्त्यावरील खळी पाटी येथून ‘लोकमत’च्या अंकाचे पार्सल घेतले. त्यानंतर लोकमतचे अंक घेऊन परत २ कि.मी.चा तराफ्याने प्रवास करुन गावात अंकाचे वाटप केले. प्रदीप गौरशेटे हे मागील पाच वर्षांपासून ‘लोकमत’चे वितरक आहेत. त्यांच्याकडे एकूण १० अंक आहेत. या वर्षी पावसाळ्यात तीन वेळा त्यांना असा धोकादायक प्रवास करावा लागला.
हेही वाचा - जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरले; अठरा दरवाज्यातून ९४३२ क्युसेकने गोदापात्रात विसर्ग