पालम ( परभणी ) : जोरदार पावसाने शहरापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या जांभूळ बेट रस्त्यावर लेंडी नदीलापूर आला आहे. यामुळे पुलावर पाणी येऊन सकाळी ३ तास सहा गावांचा पालम शहरांशी संपर्क तुटला होता.
पालम ते जांभूळ बेट या रस्त्यावर लेंडी नदीच्या पात्रात कमी उंचीचा जुना नळकांडी पूल आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूंना गाळ साचून नळ्या बुजून गेल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडताच पुराचे पाणी पुलावर येऊन रस्ता नेहमीच बंद पडतो. मागील वर्षी तब्बल २८ वेळा हा रस्ता बंद पडला होता. याकडे शासकीय यंत्रणा व लोक प्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने पूलाचा प्रश्न कायम आहे. पाऊस पडताच पालम शहरांशी संपर्क तुटतो. दरम्यान, रविवारी झालेल्या जोरदार पावसाने फळा, सोमेश्वर, घोडा, उमरथडी, आरखेड या गावांचा १४ जून रोजी सकाळी ७ ते १० प्रयत्न संपर्क तुटला होता. पुलाच्या शेजारी प्रवाशांना ताटकळत बसून पाणी ओसरण्याची वाट पहावी लागत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने ५ गावांना पावसाळ्यात नेहमीच त्रास सहन करावा लागतो.