कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या तसेच सर्वसाधारण सभा ऑनलाईनच्या माध्यमातूनच घेण्यात येत होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने प्रत्यक्ष सभा व बैठकांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद सीईओ शिवानंद टाकसाळे, शिक्षण सभापती अंजलीताई आणेराव, कृषी सभापती मीराताई टेंगसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, कैलास घोडके, ओमप्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी सुप्पा - बोर्डा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या ३० लाख ९८ हजार ९१६ रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. तसेच चिकलठाणा बु. ते चिकलठाणा तांडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठीच्या ३१ लाख १९ हजार १२ रुपयांच्या कामाच्या निविदेस तसेच जोड रस्ता रेगाव ते नांदेड सरहद्दपर्यंत रस्त्याची सुधारणा करणे, या ३१ लाख २६ हजार १३९ रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली. तसेच जोड रस्ता कवडधन राज्य मार्ग ३३५ला मिळणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे (किंमत ३९ लाख ८७ हजार १०८ रुपये), आसेगाव ते सोन्ना रस्त्याची सुधारणा करणे (किंमत ४४ लाख ६३ हजार ११७ रुपये ), साडेगाव ते बोबडे टाकळी रस्त्याची सुधारणा व नळकांडी पूल बांधकाम (किंमत ३४ लाख ६८ हजार ५७८ रुपये), घटांग्रा ते घटांग्रा तांडा रस्त्याची सुधारणा करणे (किंमत ३१ लाख २९ हजार १९१ रुपये) अशा एकूण ७ रस्त्यांच्या २ कोटी ४३ लाख ९२ हजार ६१ रुपयांच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली.
जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई
सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या घाईत आहेत. अशावेळी काही कृषी निविष्ठा केंद्रांमधून शेतकऱ्यांना चढ्या दराने सोयाबीन बियाण्याची विक्री केली जात असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांनी केली. यावर कृषी सभापती मीराताई टेंगसे यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून कोणी चढ्या दराने बियाणे किंवा खताची विक्री करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश कृषी विकास अधिकाऱ्यांना दिले.
कोविडच्या उपाययोजनांबद्दल समाधान
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. ऑक्सिजनची कमतरता जाणवू दिली नाही. जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयाचा हजारो रुग्णांना फायदा झाला. याबद्दल आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.