गंगाखेड: वाळूधक्क्यांचा लिलाव झाला नसल्याने विनापरवाना चोरून वाळूचा उपसा करण्यासाठी वाळूमाफियांनी गोदावरी नदीपात्रात धुमाकूळ घातल्याचे चित्र ८ जानेवारी रोजी पहावयास मिळाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून गोदावरी नदीपात्रातील धक्क्यांचा लिलाव झाला नसल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. वाळूपासून मिळणाऱ्या पैशांना चटावलेल्या वाळू माफियांनी तालुक्यातील मैराळसावंगी / गौंडगाव शिव, धारासुर शिव, महातपुरी, आनंदवाडी परिसरात रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालत आहेत. वाळू उपसा चालविल्याचे वृत्त यापूर्वी अनेकवेळा प्रसिद्ध झाल्याने या वृत्ताची दखल घेत वाळू, मुरूम, माती आदी गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी ८ जानेवारी रोजीपासून महातपुरी -सोनपेठ रस्त्यावर असलेल्या ३३ केव्ही कार्यालयाजवळ चेकपोस्ट तयार केले आहेत. यामध्ये तलाठी, कोतवाल व पोलीस कर्मचारी अशा तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करीत वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे महातपुरी व आनंदवाडी परिसरातून होत असलेल्या वाळू उपशाला काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसत आहे. ८ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील मैराळसावंगी येथील मैराळसावंगी -गौंडगाव शिवरस्त्यावरून गोदावरी नदीपात्रात जाऊन पाहणी केली. तेव्हा वाळूमाफियांनी रात्रीच्या वेळी थेट गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टर घालून नदी पात्रातील वाळूचा अवैधरित्या उपसा करून चोरी केल्याच्या खुणा जागोजागी पहावयास मिळाल्या. विशेष म्हणजे, उपसा केलेल्या वाळूच्या साठ्याबाबत चौकशी केली असता रात्रीच्या वेळी उपसा केलेल्या वाळूचे रस्त्यालगत साठे करून पहाटेच्या सुमारास या वाळूची विल्हेवाट लावल्या जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
रात्रीच्या वाळू उपशाकडे महसूलचे दुर्लक्ष
रात्रीच्या वेळी होत असलेल्या अवैध वाळू उपशाकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सद्यस्थितीवरून स्पष्ट होत आहे. वाळूचोरीकडे तसेच जप्त केलेल्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मैराळसावंगी, गौंडगाव येथे नियुक्त केलेल्या व्यक्तीच या अवैध वाळू उपशात सहभागी असल्याचेही ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले. गोदावरी नदीपात्रातील वाळूचोरी रोखण्यासाठी गंगाखेड- परभणी रस्त्यासह पालम रस्त्यावर तसेच धारासूर- साळापुरीमार्गे भारस्वाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही चेकपोस्ट करणे गरजेचे असल्याचे बोलून दाखविले.