पाथरी (परभणी ) : तालुक्यात वाळू माफियाने थैमान घातले असून अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. महसूल यंत्रणा कारवाई करत असली तरी वाळू माफियांचे धाडस कमी होताना दिसत नाही. पाथरी -गुंज रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पथकाने पाठलाग केला. ट्रॅक्टर वाळूच्या ट्रालीसह ताब्यात ही घेण्यात आले. कारवाई करू नये अशी विनवणी करणाऱ्या मालकाने जबरदस्तीने ट्राली जागेवर सोडून देत पथकाच्या ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेले. हा प्रकार बुधवारी (दि.१७ ) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडला
पाथरी तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरा चुकवून अनेक ठिकाणाहून अवैध वाळूचा प्रचंड उपसा केला जात आहे. एवढेच नाहीतर अधिकाऱ्यावर नजरा ठेवण्यासाठी खबरे ठेऊन वाळू चोरी केली जात आहे. बुधवारी बाभलगाव चे मंडळ अधिकारी पी एन गोवंदे आणि तलाठी अतुल निरडे हे उमरा येथील अवैध वाळू उपसा प्रकरणी चौकशीसाठी गेले होते. उमरा येथून परत येत असताना गुंज शिवारात त्याना वाळूने भरलेला ट्रॅक्टर दिसला पथक दिसताच ट्रॅक्टर चालकाने ट्रक्टर लोणी तांडा मार्गे कॅनाल ने पळवले पथकाने त्याचा पाठलाग केला.
समोरून बैलगाडी येत असल्याने ट्रक्टर कॅनलच्या रस्त्याच्या खाली उतरले आणि पथकाने ट्रॅक्टर पकडले. चावी काढून घेताच चालकाने पळ काढला. ट्रॅक्टर पकडल्याची माहिती ट्रॅक्टर मालकाला मिळाली नंतर काही वेळात 8 ते 10 जण दुचाकी घेऊन आले आणि पथकासमोर ट्रॅक्टरच्या ट्रालीतील वाळू खाली टाकली. यानंतर ट्रोली जागीच सोडून त्यांनी ट्रॅक्टरचे हेड घेऊन पोबारा केला. घटनास्थळी असलेले मंडळ अधिकारी गोवंदे यांनी तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांना माहिती दिल्या नंतर पोलीस कर्मचारी , तसेच नायब तहसिलदार कैलास वाघमारे ,मंडळ अधिकारी बिडवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.