गंगाखेड: अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई करण्यासाठी आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर वाळू माफियांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी ( दि. ३ ) सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास पिंप्री (झोला) गावालगत गोदावरी नदी पात्रात घडली. पोलीसांनी एक ट्रॅक्टर व जेसीबीसह एकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी २५ जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील धक्क्याचा लिलाव होवो अथवा न होवो वाळू माफियांचा अवैधरित्या वाळू उपसा रात्रंदिवस चालूच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि व्यंकटेश आलेवार यांच्या आदेशाने गंगाखेड, पालम व सोनपेठ हद्दीतील गोदावरी नदी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांच्यासह दिलावर पठाण, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, निळे व संतोष सानप यांचे पथक रवाना झाले. दैठणा येथे आल्यानंतर गंगाखेड तालुक्यातील पिंप्री (झोला) गावालगतच्या गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर व जेसीबी मशीनच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. यावरून पथकाने सायंकाळी पाच ते सहा वाजे दरम्यान या पथकाने पिंप्री (झोला) गावालगत गोदावरी नदी पात्रात छापा मारला असता २० ते २५ जण एक जेसीबी मशीन व दहा ते बारा ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतुक करीत असल्याचे दिसून आले.
पोलीस आल्याचे पाहून नदी पात्रातील ४ ते ५ ट्रॅक्टर घेऊन सर्व जण पळून गेले. पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मंगेश केशव भिसे यास ताब्यात घेतले तेंव्हा पळून गेलेले ट्रॅक्टर मालक व चालक असे २० ते २५ जण काही वेळाने हातात काठ्या व दगड घेऊन आले. त्यांनी शिवीगाळ करत पथकावर दगडफेक सुरु केली. पथकातील पोलिसांनी याची माहिती सपोनि व्यंकटेश आलेवार व गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. यानंतर सपोनि विकास कोकाटे, जमादार मदन सावंत, गोविंद मुरकुटे, अनंत डोंगरे, पुरूषोत्तम मूलगीर आदींसह स्थागुशाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दगडफेकीत संतोष सानप व किशोर चव्हाण हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
याप्रकरणी १) नंदू आनंदराव भिसे, २) चक्रधर आनंद भिसे, ३) रामा कांबळे, ४) बाळू भारत भिसे, ५) भगवान माधवराव बचाटे, ६) विष्णू मोतीराम भिसे, ७) दत्ता मोतीराम भिसे, ८) विठ्ठल धारबा मात्रे, ९) सर्जेराव लक्ष्मणराव खटिंग, १०) कृष्णा अच्युतराव भिसे, ११) शिवाजी खटिंग, १२) असेफ (पूर्ण नाव माहीत नाही), १३) अनिल अच्युत भिसे, १४) सुनील आनंदराव गेजगे, १५) मंगेश केशवराव भिसे सर्व रा. पिंप्री (झोला), १६) अल्ताफ (पूर्ण नाव माहीत नाही) रा. ईसाद ता. गंगाखेड व अन्य ८ ते ९ जण अशा २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मंगेश केशवराव भिसे यास ताब्यात घेतले असून एकूण २० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सपोनि विकास कोकाटे हे करीत आहेत.