जिल्ह्यात वाढला धुळीचा त्रास
परभणी : जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जिंतूर रोड, गंगाखेड रोड या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ पसरली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने या मार्गावरही धूळ वाढली आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे धुळ यामुळे जिल्हावासियांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.
उद्यान विकासाची कामे शहरात ठप्प
परभणी : शहरातील उद्यानाच्या विकासाची कामे ठप्प पडली आहेत. नानलपेठ भागातील शिवाजी पार्क आणि गव्हाणे चौक भागातील नेहरू पार्क या दोन्ही उद्यानांची दुरवस्था झाली आहे. नेहरु पार्कच्या सुशोभिकरणासाठी मोठा खर्च करण्यात आला. मात्र केवळ देखभाल, दुरुस्ती अभावी या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे शिवाजी पार्क विकासासाठी निधी प्राप्त झालेला असताना येथील काम ठप्प आहे. दोन्ही उद्यानांची बकाल अवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा हिरमोड होत आहे.
शाळांमध्ये वाढली विद्यार्थी संख्या
परभणी : जिल्ह्यात दोन आठवड्यापासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. मात्र आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शाळा नियमित सुरू झाल्या असून, काही शाळांनी हळूहळू नववीचे वर्गही सुरु केले आहेत. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचा वापर करीत विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत.
वृक्षारोपण मोहिमेचे उद्दिष्ट अपूर्ण
परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने वृक्षलागवड मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. परिणामी जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. जिल्ह्यात यावर्षी ३ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जून आणि जुलै महिन्यात काही भागात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र त्यानंतर ही मोहीम बारगळली. परिणामी चांगला पाऊस झाल्यानंतरही जिल्ह्यात नवीन झाडांची संख्या वाढली नाही.