ग्रामीण भागात ऊस काढणीला वेग
परभणी : जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या ऊस काढणीला वेग आला आहे. साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, उसाची काढणी करून तो साखर कारखान्यावर नेला जात आहे. ऊस कारखान्यावर घालण्यासाठी उत्पादक शेतकरी कारखाना प्रशासनाच्या संपर्कात असून, लवकरात लवकर उस तोडून न्यावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
बाह्य वळण रस्त्याचे काम ठप्प
परभणी : शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्याचे काम ठप्प पडले आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे. निधी नसल्याने वर्षभरापासून काम ठप्प आहे.
मास्कविरुद्धची कारवाई बारगळली
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध कारवाई सुरू केली होती. सुरुवातीचे काही दिवस कडक कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रशासनाने ढिलाई दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तसेच तालुक्याच्या ठिकाणी अनेक नागरिक विनामास्क फिरत असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
सार्वजनिक हातपंप बंद अवस्थेत
परभणी : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सार्वजनिक हातपंप घेतल्या आहेत. मात्र या हातपंपाचे साहित्य गायब झाले असून, हातपंप बंद पडले आहेत. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. तेव्हा बंद हातपंप सुरू करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
रस्त्याच्या कामाने घेतला वेग
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या कामाने वेग घेतला आहे. शहरी भागात हे काम सुरू झाले असून, एका बाजूचे सिमेंट कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सध्या या मार्गावर एकाच बाजूने वाहतूक केली जात आहे.
रेल्वेस्थानकावरील पार्किंगचा बोजवारा
परभणी : येथील रेल्वे स्थानकावर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. नागरिक कुठेही वाहने उभी करीत असल्याने प्रवाशांना स्थानक गाठताना कसरत करावी लागते. मध्यंतरी नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली जात होती. मात्र सध्या ही कारवाई बंद असल्याने नो पार्किंगमध्ये वाहने उभी केली जात आहेत.
विविध फळांची बाजारपेठेत आवक
परभणी : जिल्ह्याच्या बाजारपेठेत सध्या विविध फळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. द्राक्ष, सफरचंद टरबूज, मोसंबी, पपई आदी फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असून, भावही आवाक्यात असल्याने या फळांना मागणी वाढली आहे.
अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती रखडली
परभणी : शहरातील विविध वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे ठप्प पडली आहेत. शासनाने मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.