- अभिमन्यू कांबळे
शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यावर चढाई करण्यासाठी विरोधातील दिग्गज नेते मंडळींनी तयार केलेले चक्रव्यूह भेदून संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यावर विजय मिळवीत ३० वर्षांचे पक्षाचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक यावेळी रंगतदार व प्रचंड उत्सुकतेची ठरली. १९९१ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून यावेळी विजय मिळवायचाच या इराद्याने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी प्रचारात पेटून उठली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासाठी जिंतूरचे आ.विजय भांबळे, गंगाखेडचे आ.मधुसूदन केंद्रे, घनसावंगीचे आ.राजेश टोपे, विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.रामराव वडकुते हे राष्ट्रवादीचे पाच आमदार तसेच काँग्रेसचे माजी आ. सुरेश देशमुख, माजीमंत्री तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी मंत्री फौजिया खान, माजी आ.सुरेश जेथलिया, माजी आ.व्यंकटराव कदम, माजी आ.सीताराम घनदाट, माजी आ. ज्ञानोबा हरी गायकवाड हे सात माजी आमदार तसेच राष्ट्रवादीचे माजी खा.सुरेश जाधव, काँग्रेसचे माजी खा.तुकाराम रेंगे या तब्बल १४ मातब्बर नेत्यांनी विटेकर यांचा प्रचार केला. तसेच भाजपचे आ. मोहन फड यांनीही राष्ट्रवादीसाठी परिश्रम घेतले. या नेत्यांनी आपले राजकारणातील कसब पणाला लावून विटेकर यांना निवडून आणण्याची रणनीती आखली. त्यामुळे कागदावर ताकदवान दिसणाऱ्या या नेत्यांची संख्या पाहुन अनेक संस्थांनी एक्झिटपोलमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकली होती.
एकीकडे राष्ट्रवादीकडून प्रचाराचा गवगवा केला जात असताना सेनेकडून मात्र सुप्त पद्धतीने थेट मतदारांशी संपर्क साधणारी जाधव यांची प्रचार यंत्रणा सक्रिय होती. त्यामुळेच प्रारंभीपासूनच परभणीचा गड आपण कायमच राखणार, असा त्यांनी दाखविलेला आत्मविश्वास निकालअंती खरा ठरला आहे. आता निवडणुका संपल्या असल्या तरी प्रचारात खा.जाधव यांच्यावर स्वकीयांसह विरोधकांनी केलेल्या राजकीय वाराच्या जखमा ताज्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जाधव यांचे राजकारण आक्रमक राहणार आहे. तसे संकेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
संजय जाधवांची एकाकी लढतशिवसेनेचे उमेदवार संजय जाधव एकाकी लढले. त्यांना काही अंशी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, हिकमतराव उडाण, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांची साथ लाभली. प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, राजकारणातील ३४ वर्षांचा अनुभव आणि कार्यकर्त्यांचे तगडे नेटवर्क याच्या बळावर खा.जाधव यांनी या सर्व दिग्गज नेत्यांचे चक्रव्यूह भेदून अविश्वसनीय वाटणारा विजय साकारत एक्झिटपोलचा अंदाज साफ खोटा ठरविला.
स्कोअर बोर्डलोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना एकूण ५ लाख ३८ हजार ९४१ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना १ लाख ४९ हजार ९४६ मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचे जाधव यांनी राष्ट्रवादीचे विटेकर यांच्यावर ४२ हजार १९९ मतांनी विजय मिळविला. सहा विधानसभा मतदारसंघापैकी जिंतूर, गंगाखेड, घनसावंगी व परतूर या चार विधानसभा मतदारसंघांतून शिवसेनेला तर परभणी व पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला आघाडी मिळाली.