देवगाव फाटा : सेलू -पाथरी रस्त्यावरील देऊळगाव गात पाटीपासून ते लाडनांदरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी सरपंच मीना गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
देऊळगाव गात-डासाळा- लाडनांदरा, राधे धामणगाव व खवणे पिंपरी ग्रामस्थांना सेलू शहर गाठण्यासाठी देऊळगाव ते लाडनांदरा रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र या रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने गिट्टी वर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा तालुका प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी सरपंच मीना रवींद्र गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.