परभणी: शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या धर्मापुरी गावात मागील दोन ते अडीच वर्षांपासून सरपंचपती हे दररोज गावात स्वच्छता फेरीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे महत्त्वाचं काम प्रामाणिकपणे पार पडत आहेत. त्यामुळे गावात स्वच्छता राखली जात असून रस्तेही चकाचक दिसून येत आहेत.
धर्मापुरी हे गाव शहरालगत असल्यामुळे स्वच्छतेसाठी मजुरांची वाणवा आहे. स्वच्छता कामासाठी ग्रामपंचायतीला इतर उत्पन्नाचे साधने नसल्यामुळे पुरेसा निधी उपलब्ध नाही. जवळपास ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मोकळ्या जागांची कमतरता निर्माण झालेली आहे. कचरा व्यवस्थापनाचा जुना प्रकार म्हणजे उकिरडे जवळपास नामशेष झालेले आहेत. त्यामुळे स्वच्छतेची जबाबदारी पार पडताना मोठी अडचण निर्माण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी गावचे सरपंच दिक्षा पैठणे, नवनाथ पैठणे व त्यांचे सहकारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता फेरी काढण्याचा संकल्प केला आणि मागील अडीच वर्षापासून तो अविरतपणे सुरू ठेवला आहे.
सकाळी लवकर उठून दररोज कचरा संकलनाचे काम सुरू होतं. साधारणतः एक- दोन तास गावात घरोघरी जाऊन कचरा संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम होत आहे. त्यामुळे गावामध्ये स्वच्छता राहण्यास मदत होत आहे. गावकरी देखील या उपक्रमास चांगले सहकार्य करीत आहेत. आपल्या घरातील कचरा इतरत्र न फेकता आप-आपल्या कचरा पेटी मध्ये गावकरी नियमितपणे जमा कचरा जमा करतात. त्यानंतर या कचरा पेटीतील कचरा उचलून सकाळी सरपंच पती हे कचरा गाडीत टाकतात. गाव शहरालगत असल्यामुळे स्वच्छता कामगारांची उपलब्धता सहजा सहजी होत नाही. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी बारावी शिकलेल्या सरपंच पती नवनाथ पैठणे यांनी स्वतःच कचरा गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात देखील आणला. त्यांच्या या उपक्रमाचं गावकऱ्यांबरोबरच पंचक्रोशीतील गावांमधून कौतुक होत आहे.
माझे गाव माझी जबाबदारीगावकऱ्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून युवा पदाधिकाऱ्यांवर गावाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गावाच्या विकास कामाबरोबरच स्वच्छतेची जबाबदारी देखील ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याची असल्यामुळे हे आमचे कर्तव्य असल्यामुळे माझे गाव माझी जबाबदारी अशी भावना ठेवून मी हे स्वच्छतेचे काम करीत आहे. तसेच या कामासाठी गावकऱ्यांबरोबरच उपसरपंच तानाजी कदम, सोसायटीचे चेअरमन,सदस्य, मित्रमंडळी ज्येष्ठ नागरिक आजी, माजी पदाधिकारी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य करीत असल्याचे दिसून आले. ग्रामस्वच्छतेची चळवळ प्रामाणिकपणे राबविणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचा आदर्श अन्य गावाने देखील घ्यावा, असे मत सरपंच दिक्षा पैठणे यांनी व्यक्त केले.
स्वच्छ धर्मापुरी सुंदर धर्मापुरीसाठी प्रयत्न‘‘लोकसंख्येच्या तुलनेत गावासाठी म्हणावा तेवढा निधी मिळत नाही, अशा परिस्थितीत देखील ग्राम विकासासाठी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत .गावामध्ये पाच रुपयात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. बहुतांश रस्ते मजबुतीकरण, भूमिगत नाल्यांची कामे झालेले आहेत. अजूनही स्वच्छ धर्मापुरी सुंदर धर्मापुरी करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळाला तर आमचं गाव आमची शाळा , निश्चितपणे अधिक स्वच्छ अधिक सुंदर व्हावी, यासाठी आगामी काळात आमचा प्रयत्न राहील.- नवनाथ पैठणे, सरपंच पती