शेतकऱ्यांना मिळेनात मजूर
परभणी: मजुरीच्या दरात वाढ करूनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नाईलाजाने शेतीकामासाठी यंत्रांचा वापर करावा लागत आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. सद्य:स्थितीत शेतीमध्ये कापसाची काढणी सुरू आहे. याचबरोबर शेतातील पाण्यावर घेतलेल्या पिकांच्या मशागतीची कामे ही वेगाने सुरू आहेत. मात्र, मजूर मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
कर्मचाऱ्यांकडून ‘ड्रेस कोड’ला ‘खो’
परभणी : शासनाने ठरवून दिलेला ड्रेसकोड न वापरता रंगीबेरंगी कपडे परिधान करून शासकीय कार्यालयात कामकाजावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नसल्याने ड्रेसकोडची संकल्पना गुंडाळली जात आहे. विशेष म्हणजे शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड वरून सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांची ओळख पटावी या उद्देशाने ‘वर्ग-४’च्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड बंधनकारक करण्यात आला आहे.
वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरूच
गंगाखेड : धक्क्यांचा लिलाव झाला नसल्याने विनापरवाना चोरून वाळूचा उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी गोदावरी नदीपात्रात धुमाकूळ घातल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून गोदावरी नदीपात्रातील धक्क्यांचा लिलाव झाला नसल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. वाळूपासून मिळणाऱ्या पैशांना चटावलेल्या वाळूमाफियांनी तालुक्यातील मैराळ सावंगी, गोंडगाव, धारासुर, महातपुरी, आनंदवाडी आदी परिसरात धुमाकूळ सुरू आहे.
खाद्यतेलाचे भाव भिडले गगनाला
परभणी : अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर मागील दोन महिन्यांपासून सततच्या बाजारपेठेतील दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरिबांच्या घरातील फोडणी बंद होण्याची वेळ आली आहे. सोयाबीन तेलाचा डबा पूर्वी पंधराशे रुपयांपर्यंत मिळत होता. आता हाच डबा २२०० रुपयांच्या घरात गेली आहे. सरकीच्या तेलाचा दरही ११५ रुपये किलोवरून १२० रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. सूर्यफूल १३५, पामतेल १२५ तर सोयाबीन १४० तसेच शेंगदाणा तेल १८० रुपये किलोवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेत खाद्यतेलाची होत असलेली भाववाढ सर्वसामान्यांच्या खिशांवर आर्थिक बोजा टाकणारी ठरत आहे.