परभणी : शहरासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यात कुठे रिमझिम स्वरूपाचा तर कुठे जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
मागील काही दिवसांपासून खंड दिलेल्या पावसाने शनिवारी हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. परभणी शहर परिसरात शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावली. यानंतर ढगाळ वातावरण कायम होते. दुपारच्या सुमारास सुद्धा काही वेळ पावसाने हजेरी लावली.
परभणीसह जिल्ह्यातील पाथरीत शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. तसेच मानवत मध्ये अर्धा तास विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. शिवाय सेलूत रिमझिम, झरीत रिमझिम, गंगाखेडमध्ये ढगाळ वातावरण होते. जिंतूरमध्ये रिमझिम, ताडकळस परिसरात अर्धा तास रिमझिम आणि सोनपेठ येथे ढगाळ वातावरण होते. सायंकाळपर्यंत विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून खंड दिल्यानंतर शनिवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे समाधान व्यक्त होत आहे.