लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या पैशांवर डल्ला मारत २ लाख ३५ हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याच्या घटना शुक्रवारी परभणी आणि पूर्णा शहरात घडल्या आहेत. परभणीत १ लाख ९५ हजार तर पूर्णा शहरातून अशाच पद्धतीने ४० हजार रुपयांची चोरी झाली. दोन्ही घटनांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे.परभणी तालुक्यातील पिंगळी येथील निळकंठ शंकरराव रणदिवे यांच्या बँक खात्यात उसाचे पैसे जमा झाले होते. सालगड्यांना पैसे द्यावयाचे असल्याने निळकंठ रणदिवे आणि नाथराव डुबे हे दोघे शुक्रवारी परभणीत आले. वसमत रस्त्यावरील इंडिया बँकेतील खात्यातून रणदिवे यांनी १ लाख ९५ हजार रुपये काढले. बँकेसमोरच उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिक्कीत त्यांनी हे पैसे ठेवले. त्यानंतर पेट्रोल भरण्यासाठी म्हणून रणदिवे हे वसमत रस्त्याने दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चालत्या गाडीच्या डिक्कीतील पैसे घेऊन त्या ठिकाणाहून पोबारा केला. दरम्यान, पैसे चोरी झाल्याचे समजताच रणदिवे यांनी आराडाओरडा केला; परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले; परंतु, त्यात फारसे काही हाती लागले नाही. या प्रकरणी निळकंठ शंकरराव रणदिवे यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरुन गुन्हा नोंद झाला आहे. पीएसआय श्रीधर वाघमारे तपास करीत आहेत.पूर्णेतही ४० हजार लंपास४पूर्णा : मोटारसायकलच्या डिकीतील ४० हजार रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी शहरातील बसवेश्वर चौकात घडली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.४नांदेड येथील मित्राकडून हातउसणे घेतलेले पैसे परत करण्यासाठी तालुक्यातील कान्हेगाव येथील कामाजी सीताराम नवघरे यांनी १२ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पूर्णा शहरातील इंडिया बँकेच्या खात्यातून ४३ हजार रुपये काढले होते. त्यापैकी ३ हजार रुपये खिशात ठेवून उर्वरित ४० हजार रुपये मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवरील डिकीच्या बॅगमध्ये ठेवले होते. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावर मोटारसायकल उभी करुन किराणा सामान घेऊन परत येईपर्यंत डिकीतील ४० हजार रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी नवघरे यांच्या फिर्यादीवरुन पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार तपास करीत आहेत.
परभणीदुचाकीच्या डिकीतून लांबविले सव्वादोन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:32 PM