गंगाखेड (जि. परभणी) : पूर्वी जामीन घेतलेला असतानाही वर्षभरातच दुसऱ्यांदा ‘शपथपूर्वक सांगतो की...’ म्हणत जामीन घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक तथा प्रभारी सहायक अधीक्षक रत्नप्रभा लक्ष्मणराव पंडित यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलिस ठाण्यात बालाजी पंढरीनाथ सानप, गोविंद बालाजी सानप, राजू गोविंद सानप (रा. वाघदरा) व उत्तम नामदेव मुंडे (रा. आरबूजवाडी) या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील वाघदरा येथील बालाजी पंढरीनाथ सानप, गोविंद बालाजी सानप, राजू गोविंद सानप व आरबूजवाडी येथील उत्तम नामदेव सानप यांनी ३ फेब्रुवारी २०२३ रोजी जामीन घेतला होता. यानंतरही सर्वांनी संगनमत करून व विचारविनिमय करून एप्रिल २०२४ या महिन्यात कार्यालयीन वेळेत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्यासमोर शपथेवर यापूर्वी कोणाचाही जामीन घेतलेला नाही, असे खोटे बोलून न्यायालयाची फसवणूक केल्याची बाब न्यायालयात उघडकीस आली. यावरून कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपिक तथा प्रभारी सहायक रत्नप्रभा पंडित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर करत आहेत.