गंगाखेड : शहराजवळील मुळी बंधाऱ्याला गेट नसल्याने मागच्या वर्षभरात या बंधाऱ्यात पाणी साचले नाही. मात्र गोदावरी नदीपात्रात मातीचा भराव टाकून धारखेडजवळ केलेल्या छोट्याखानी बंधाऱ्यात साचलेले पाणीही आता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहून गेले आहे. पाईप टाकताना १६ फेब्रुवारी रोजी हा बंधारा फुटला असून, पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोदावरी नदीकाठी गंगाखेड शहर असून सुद्धा उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. शहरातील काही भागाला मासोळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे.तर गोदावरी नदी परिसर व अन्य भागाला गाेदावरील नदीपात्रातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. सद्यस्थितीत शहराला ८ ते १० दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात गोदावरी नदीपात्र कोरडे पडतात. शहरातील काही भागाला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मागील पावसाळी हंगामात तालुक्यात पावसाने जोरदारी हजेरी लावल्याने मासोळी प्रकल्प १०० टक्के भरला. गोदावरी नदीपात्रातही गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे कंत्राटदाराने नदीपात्रात टाकलेल्या मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यान, नदीपात्रातील पाणी दोन महिने पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवण झाली होती. याच पाण्यातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मातीच्या कच्च्या रस्त्यात पाईप टाकण्याचे काम केले जात असल्याने मातीचा भराव फुटल्याने साठवण झालेले पाणी नदीपात्रात वाहून गेले. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयुक्त असलेल्या पाण्याचा साठा आगामी उन्हाळ्यापर्यंत कायम ठेवण्यास स्थानिक नगरपालिका व महसूल प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दोन महिने पुरेल एवढा झालेला पाणीसाठा क्षणात वाहून गेला. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या भीषण पाणीटंचाईला हे स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
महसूल प्रशासनाला दिली होती कल्पना
गंगाखेड शहराजवळ गोदावरी नदीपात्रात साठवण झालेल्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. नगरपालिका प्रशासनाने ८ फेब्रुवारी रोजी तहसील व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात पत्र दिले होते. त्यामध्ये भविष्यात शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवित जलवाहिनी टाकण्याच्या कामाविषयी आपल्यास्तरावर कार्यवाही करण्याची विनंती यामध्ये केली होती. मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही. १६ फेब्रुवारी रोजी काही अज्ञात व्यक्तींनी कच्च्या मातीचा भराव फोडल्याने गोदावरी नदीपात्रात साठवण झालेले पाणी वाहून गेले. दरम्यान, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी या मातीचा भराव फोडून पाणी सोडून देणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्याकडे केली आहे.