परभणी : यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नसल्या, तरी निकाल द्यावयाचा आहे. हा निकाल देताना शिक्षकांसमोर अडचणी येत आहेत. निकाल वेळेत न दिल्यास शाळाच जबाबदार राहणार असल्याने शाळा अन् शिक्षकांवर निकाल वेळेत दाखल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मात्र या विद्यार्थ्यांचा निकाल देणे बंधनकारक आहे. निकाल देण्यासाठी ठराविक मूल्यमापन पद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकांचा मोठा वेळ जात आहे. विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षण मंडळाकडे दाखल करण्यासाठी दिलेला अवधी संपत आला असून, अनेक शाळांनी अद्याप शिक्षण विभागाकडे निकाल दाखल केला नाही. त्यामुळे निकाल वेळेत जमा करण्यासाठी शाळाच जबाबदार राहणार असून, या प्रक्रियेला गती द्यावी लागणार आहे.
दहावी परीक्षेचा निकाल देताना नववीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण तसेच दहावीची उपस्थिती, गृहपाठ, विविध उपक्रमांचे मूल्यमापन करून गुणदान करावयाचे आहे.
हे गुणदान करताना सरासरी १०० च्या पटीत काढावयाची आहे. यात शिक्षकांचा मोठा वेळ जात आहे.
ही सर्व प्रक्रिया करताना शिक्षकांसमोर अडचणी निर्माण होत असून, निकाल देण्यासाठी विलंब लागत आहे.