कोरोनाच्या संकटामुळे दहावी वर्गाच्या परीक्षा यावर्षी झाल्या नाहीत. मात्र दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ठराविक प्रक्रिया निश्चित करून ऑनलाईन भरण्याच्या सूचना शाळांना दिल्या होत्या. जिल्ह्यातील १०० टक्के मूल्यांकन भरून बोर्डाकडे सादर केले आहे. आता मात्र अनेक शाळांनी केलेले मूल्यांकन परत आले असून, त्यात त्रुटी असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. त्यामुळे मूल्यांकन दुरुस्त करून ते पुन्हा सादर करावे लागणार असल्याने निकाल लांबण्याची शक्यता आहे.
मूल्यांकनातील या चुका कोणी सुधारायच्या?
मूल्यांकन करताना त्यांनी मागीलवर्षीच्या रिपिटर विद्यार्थ्यांचे गुणदान केले नव्हते. या विद्यार्थ्यांचे गुण आता बोर्डाने मागवले आहेत.
विशेष म्हणजे गुणपत्रिकेसह गुण मागविले असल्याने शाळांची अडचण झाली आहे. त्यातच मागीलवर्षीचे तोंडी परीक्षेचे गुणही समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातील असून, त्यांनी परभणी जिल्ह्यातील शाळांमध्ये दहावीची परीक्षा दिली होती, अशा विद्यार्थ्यांचे गुणपत्रक शोधण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
१०० टक्के शाळांनी कळविले मूल्यांकन
जिल्ह्यात दहावीच्या मूल्यांकनाला शाळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. वेळेच्या आत १०० टक्के शाळांचे मूल्यांकन बोर्डाकडे दाखल केले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने मूल्यांकन दाखल केले असताना, आता मात्र थेट मेलवर मूल्यांकन मागविण्यात आले आहे.