परभणी : राज्य शासनाच्या ई पीक पाहणी प्रकल्पाला जिल्ह्यात धिमा प्रतिसाद मिळाला असून, नोंदणीपासून वंचित राहिलेल्या २ लाख ७० हजार ९६१ शेतकऱ्यांची ई पीक पाहणी उपक्रमाअंतर्गत नोंदणी करण्याची जबाबदारी आता उपविभागीय अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवून ही नोंदणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेत.
१५ ऑगस्टपासून राज्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे नमुना नंबर १२ मध्ये नोंद करून घेतली जात आहे. मात्र अतिवृष्टी, पूरस्थिती आणि कोरोनामुळे या नोंदणीला जिल्ह्यात धिमा प्रतिसाद मिळाला. २० सप्टेंबरपर्यंत केवळ ७६ हजार ९५७ शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून नोंदणी केली आहे. उर्वरित २ लाख ७० हजार ९६१ शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करून पीक पेरा ई पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये नोंदविण्यासाठी आता २२ ते २४ सप्टेंबर या तीन दिवसात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तेव्हा या काळात सूक्ष्म नियोजन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या आहेत.
जनजागृती करून नोंदणीचे उद्दिष्ट
प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, ग्राम रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र आदींच्या माध्यमातून ॲप डाऊनलोड करून नोंदणी करण्याची कारवाई करावयाची आहे. तसेच ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांना पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जबाबदारी निश्चित करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या तालुक्यात किती टक्के काम
परभणी १५.६७
गंगाखेड १७.५४
पूर्णा ९.४६
पालम १६.३८
पाथरी ९.७०
सोनपेठ ७.०७
मानवत १६.०७
सेलू ७४.२४
जिंतूर २४.९०
एकूण २२.१२