पाथरी ( परभणी) : दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री साठी सुरू करण्यात आलेल्या प्रणालीत भूमिअभिलेख ( land record) सर्व्हर सतत डाऊन राहत असल्याने दस्तऐवज नोंदणी रखडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी हे सर्व्हर डाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प असून नागरिकांनी नाहक त्रास होत आहे.
राज्य शासनाने खरेदी विक्री व्यवहारात गैरप्रकार टाळण्यासाठी आणि पारदर्शकता येण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व व्यवहार ऑनलाइन केले आहेत. या प्रक्रियेत सुधारणा करताना अनेक अडचणी ही निर्माण होत आहेत. ऑनलाइन खरेदी विक्री चा व्यवहार करत असताना आता या प्रणालीत ई-फेरफार ही केला जातो. त्यामुळे खरेदी विक्री व्यवहारासोबत आता भूमिअभिलेखवरील सात बारा वर झालेल्या व्यवहाराची ऑनलाइन नोंदणी झाल्याशिवाय खरेदी विक्री चा व्यवहार पूर्ण होत नाही. खरेदी विक्री चे दस्तावेज तयार झाल्यानंतर त्याची ऑनलाईन नोंदणी होते.
सोमवारी दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्री व्यवहार सुरू होते. मात्र, भूमिअभिलेखचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने सातबारा दिसत नव्हती. यामुळे शेती खरेदीविक्री चे व्यवहार झालेच नाहीत. आजसुद्धा हीच परिस्थिती राहिल्याने व्यवहार करण्यासाठी आलेले शेतकरी दिवसभर ताटकळत बसून होते.