गंगाखेड : प्लॉटची रजिस्ट्री करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील प्रभारी दुय्यम निबंधकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ ऑक्टोबर रोजी कारवाई केली आहे. या प्रकरणात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गंगाखेड शहरातील एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. गंगाखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक तथा प्रभारी दुय्यम निबंधक किशन सखाराम लवंदे याने प्लॉटच्या रजिस्ट्रीचे काम करण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी लाच मागितल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ ऑक्टोबर रोजी सापळा लावला होता. त्यावेळी तक्रारदार लाच देण्यासाठी लवंदे यांच्याकडे गेला असता मी तुम्हाला ओळखत नाही, असे सांगून लवंदे यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला.
एसीबीच्या सापळा अधिकाऱ्यांनी हॅश व्हॅल्यूचे फोटोग्राफ्स घेतले असून, लाचेची मागणी केल्याने लवंदे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अनिल कटारे, माणिक चट्टे, सचिन धबडगे, जनार्दन कदम यांनी केली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.