परभणी : अन्नपदार्थांबरोबरच सुदृढ आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधींमधील भेसळ रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन या विभागांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असून, केवळ नऊ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यातील २० लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार येऊन ठेपला आहे.
या कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त अन्न हे पद भरलेले असून, सहाय्यक आयुक्त औषध हे पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांचे १, औषध निरीक्षक, आस्थापना विभागातील लिपिक वरिष्ठ, लिपिक, प्रमुख लिपिक ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे चार अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी - कर्मचाऱ्यांची तपासणी करताना अक्षरशः कसरत होत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २० लाखांपर्यंत पोहोचली असून, या लोकसंख्येचा विचार करता अन्न व औषध प्रशासनाकडे सध्या अत्यल्प मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे अन्न भेसळ रोखण्याच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. शासनाने किमान लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांचा आराखडा मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.
औषधी दुकानांच्या तपासणीला खो
जिल्ह्यात साधारणत: २ हजारांपेक्षा अधिक औषधी दुकाने आहेत. अनेक दुकानांवर अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत (फार्मसिस्ट नसलेल्या) काम करून घेतले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे; परंतु मनुष्यबळाचा अभाव असल्याने औषधी दुकानांच्या नियमित तपासण्या होत नाहीत. परिणामी औषधी विक्रेत्यांचे फावत आहे.
हॉटेल तपासणीसाठी अडचणी
जिल्ह्यात साधारणतः ४०० पेक्षा अधिक मोठी हॉटेल्स आणि स्वीट मार्ट आहेत. या हॉटेल्सच्या तपासणीसाठीही अडचणी निर्माण होत आहेत. चार कर्मचारी जिल्ह्यातील किती हॉटेल्सपर्यंत पोहोचणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे
कोर्टकचेरीसाठी द्यावा लागतो वेळ
हॉटेल्स व औषधी दुकानांच्या तपासणीबरोबरच न्यायप्रविष्ठ प्रकरणांचाही अधिकाऱ्यांना पाठपुरवा करावा लागतो. गुटखा विक्री विरुद्धच्या सर्व कारवाया या कार्यालयामार्फत होतात. त्यातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रकरण कोर्टात दाखल करण्यापासून ते प्रत्येक सुनावणीला हजर राहाणे, कागदपत्रांची पूर्तता करणे, पुरावे जमा करणे आदी कामे अधिकाऱ्यांना करावी लागतात. यात मोठा वेळ खर्ची जातो. त्याचाही परिणामही तपासण्यांवर होत आहे.
या कार्यालयातून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. मनुष्यबळ कमी असले तरी वर्षभर तपासण्या होतात. मागील वर्षात जवळपास ३०० हॉटेल्स तपासण्या करण्यात आल्या. १०० अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून, सात जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे व भेसळीविरुद्ध वर्षभर सातत्याने कारवाया सुरू आहेत. सण, उत्सवाच्या काळात या तपासण्या वाढविल्या जातात.
नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त अन्न