परभणी : शहरातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षेविषयी फारसे गांभीर्याने घेतले जात नसून, बहुतांश एटीएम केंद्रांच्या परिसरातील सुरक्षारक्षक गायब झाले आहेत. त्यामुळे केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरच या केंद्रांच्या सुरक्षेची भिस्त आहे.
मागच्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील एटीएम केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही केंद्र बँक शाखेच्या शेजारीच आहेत. मात्र, बहुतांश केंद्र हे बँकेच्या कार्यालयापासून दूर अंतरावर आहेत. या केंद्रांच्या परिसरात सुरुवातीच्या काळात सुरक्षारक्षक नियुक्त केलेले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून हे सुरक्षारक्षक गायब झाले आहेत. जिल्हा परिषदेसमोरील जुनी हैदराबाद बँक, वसमत रस्त्यावरील युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नानलपेठ परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम केंद्र या ठिकाणी दिवसा आणि रात्रीही सुरक्षारक्षक गैरहजर असतात. त्यामुळे एटीएम केंद्रात छेडछाड करुन चोरीचा प्रयत्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका एटीएम मशीनमध्ये साधारणत: २० ते २५ लाख रुपयांपर्यंतची कॅश बसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली कॅश सांभाळण्यासाठी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने फारसी काळजी घेतली जात नसल्याचे सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे. विशेष म्हणजे काही एटीएम केंद्रांची दुरवस्था झाली आहे. केंद्रांचे दरवाजे तुटलेले असून, केंद्राच्या परिसरात अस्वच्छता असते. अधिक वर्दळ नसलेल्या भागातील एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी काळजी घेणे गरजेचे असताना त्याकडे मात्र बँक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
एटीएम फोडण्याच्या घडल्या होत्या घटना
दोन वर्षांपूर्वीच शहरात एटीएम केंद्र फोडून रक्कम पळवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. वसमत रस्त्यावरील एमआयडीसी परिसरातील स्टेट बँकेचे एटीएम मशीन जेसीबी मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी आहे. याशिवाय शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोरील एटीएम केंद्राला आग लावून त्यातील रक्कम पळवण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच एटीएम मशीनमध्ये छेडछाड करण्याचे प्रकारही सातत्याने होत असतात. या घटना लक्षात घेता, एटीएम केंद्राच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षारक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
फसवेगिरीलाही बसेल आळा
एटीएम केंद्रावर एटीएम मशीनची अदलाबदल करून खात्यातील रक्कम लांबविण्याचे प्रकार गंगाखेड, पाथरी तालुक्यात घडले आहेत. त्यामुळे गैरकायदेशीर कृत्य करणारे या केंद्रांच्या परिसरातच वावरत असतात. प्रत्येक एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षकाची नियुक्ती झाली तर भामट्यांकडून होणाऱ्या फसवेगिरीलाही आळा बसण्याची शक्यता आहे.