पाथरी : एक संशयास्पद कार मध्यरात्री पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने दुसरा रस्ता निवडला आणि इथेच डाव उलटला. दुसऱ्या रस्त्याने वळवलेली गाडी पुढे खराब रस्त्यात फसली आणि पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडण्याच्या भीतीने आरोपींनी कार तेथेच सोडून तेथून पळ काढला. पोलिसांनी 3 लाखांच्या गुटख्यासह 5 लाख 55 हजार 630 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई सोमवारी ( दि. २२ ) पहाटे १. ३० वाजेच्या सुमारास सारोळा शिवारात करण्यात आली.
रविवारी सिरसाळा येथून पाथरीकडे एका कारमधून तस्कर गुटखा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावरून पोलीस कर्मचारी बाभळगाव येथे कारवाईसाठी दबा धरून बसले होते. पोलिसांनी नाकाबंदी करत बाभळगाव रस्त्यावर रिकामा ट्रॅक्टर आडवा लावला होता. यामुळे चालकाला पोलीस जवळ असल्याचा अंदाज आला आणि त्याने कार ( एम एच 12 एन बी 4575 ) बाभळगाव गावातून सारोळा केकरजवळा रस्त्याने सुसाट नेली. पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान, सारोळा शिवारात कॅनलच्या चारीत कार फसल्याने गाडीतील तिघांनी कार सोडून पळ काढला. पोलिसांनी कारमधून गुटखा, पानमसाला आणि तंबाखू असा माल जप्त केला. यानंतर पोलिसांनी पाथरी येथील पंचायत समितीच्या कॉम्प्लेक्समध्ये एका दुकानावर याच टोळीने गुटखा लपवला असल्याची माहिती मिळाली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास येथे धाड टाकून पोलिसांनी बळीराम नवले यास ताब्यात घेऊन गुटखा जप्त केला. या दोन्ही कारवाईत 3 लाख 5 हजार 630 रुपयांचा गुटखा तसेच 2 लाख 50 हजार रुवयांची कार असा 5 लाख 55 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलिस उप निरीक्षक सूर्यकांत राऊत यांच्या फिर्यादीवरून बळीराम रामचंद्र नवले, माधव नवले ( रा. फुलारवाडी ) आणि इतर तिघे अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तपास पोलीस उप निरीक्षक मनोज अहिरे करत आहेत. ही कारवाई परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक खोले, पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, संतोष सानप , यशवंत वागमारे , विष्णू भिसे ,जहर पटेल,दीपक मुदिराज, सुधीर काळे यांनी केली.