गंगाखेड ( परभणी ): वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत.
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, मैराळ सांगवी, खळी, दुस्सलगाव, महातपुरी तांडा, गंगाखेड शहर, कासारवाडी परिसर, झोला, पिंपरी, मसला, धारखेड, मुळी, गौंडगाव, भांबरवाडी आदी परिसरात वाळूमाफियांनी गोदावरी नदीतील वाळू उपसा करून साठे तयार केले होते. हे साठे रस्त्याच्या बाजूला, शेतात, शासकीय जमिनीवर असल्याने नेमके कोणाचे साठे आहेत ? याचा अंदाज महसूल प्रशासनला येत नव्हता. हे साठे महसूल प्रशासनाने जप्त करून या साठ्यांचा लिलाव पुकारला होता. परंतु, काही वाळू साठे बेनामी अज्ञातांच्या नावे असल्याने या साठ्यांना लिलावात बोली आली नाही. महसूल प्रशासनाने असे वाळू साठे स्वत: उचलून शासकीय कामावर टाकून ठेकेदाराला विकण्याचा निर्णय घेतला.
रेल्वे उड्डाणपूल, नगरपालिकेच्या अंतर्गत बांधकामासाठी वाळू देऊन याची रक्कम ठेकेदारांकडून वसूल केली. मात्र, महातपुरी परिसरातील काही बेनामी वाळू साठे कोणीही खरेदी केले नाही. त्यामुळे २५० ब्रास वाळू पडून होती. या वाळूसाठ्याची चोरी होण्याची शक्यता बळावत असल्याने तहसील प्रशासनाने हे वाळू साठे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात हलविले आहेत. आता या वाळूसाठ्याची जबाबदारी येथील कर्मचा-यांवर वाढली आहे. यातील वाळू कमी झाल्यास विश्रामगृहातील कर्मचा-यांना दोषी धरले जाणार आहे.
कर्मचारी असमर्थ की अविश्वास...गंगाखेड तालुक्यातून वाहणा-या गोदावरी नदीतील वाळूला जिल्हाभरासह पर जिल्ह्यात मागणी आहे. त्यामुळे रात्रंदिवस वाळू उपसा केला जातो. वाळू साठे तयार करून शासकीय जमिनीवरच ठेवण्याचे धाडस माफियांमधून होत आहे. त्या त्या भागातील महसूलचे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यानेच वाळू साठे तयार करण्याचे धाडस माफिया करीत आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. तसा आरोपही नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे तहसील प्रशासनावर वाळूसाठे उचलून विश्रामगृह परिसरात हलविण्याची नामुष्की ओढावली आहे.
जप्त वाळूसाठ्यांचा जाहीर लिलाव केला जात आहे. मात्र, शासकीय जमिनीवर असलेले बेनामी वाळूसाठे लिलावात घेत नसल्याने हे वाळू साठे शासकीय कामासाठी ठेकेदारांना दिले जात आहेत. तसेच ते वाळू साठे चोरीस जाऊ नयेत म्हणून शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. - आसाराम छडीदार, तहसीलदार