सोनपेठ : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले जात आहे. या समूहाच्या माध्यमातून महिलांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने रोजगारासह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. बचत गटांच्या माध्यमातूनच महिला स्वावलंबी झाल्या असल्याचे प्रतिपादन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बायर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात बचत गटातील शेतकरी महिलांना विनामूल्य बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी तहसीलदार गिरी बोलत होत्या. याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन खुडे, मंडळ कृषी अधिकारी सुहास कोलगे, नीता धाकपाडे, सुधीर बिंदू, कालीदास मस्के यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बचत गटातील शेतकरी महिलांना टरबूज, टोमॅटो, मिरची आदी बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात खत, औषधे व आरोग्य किट तसेच प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. नसीमा सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. विजयमाला ठेंगे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अभिमन्यू भोसले, गीतांजली नाशिक यांच्यासह बचत गटाच्या महिलांनी प्रयत्न केले.