परभणी: जिल्हा हा अग्रिम पिक विम्यासाठी पात्र होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जमा करण्यात आला नाही. २ नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी, याप्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी शहरातील खानापुर फाटा परिसरात परभणी- वसमत या महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात सरासरी पेक्ष्या कमी पाऊस झाला. त्यातच पावसाने दिलेला खंडामुळे खरीप पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, जिल्हा हा अग्रिम पिक विम्यासाठी पात्र होऊन, जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीला अग्रिम रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे आदेश दिले आहेत. मात्र दिड महिना झाला तरी कंपनीने आपले आदेश पाळले नाहीत. पाऊस कमी झाल्याने जमिनीत ओल नसल्याने रब्बी पेरणी होणे शक्य नाही. अगोदरच खरीप हंगाम हातातून पूर्ण पणे गेला आहे. आता रब्बी पेरणी न झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचा व अन्न धान्य यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे.
सध्या जायकवाडी धरणात ४७ टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे जर २ नोव्हेंबरपर्यंत जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २६ ऑक्टोंबर रोजी रास्ता रोको करण्यात आला. यामध्ये किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोडे, पंडित भोसले, उत्तम माने, बालकिशन चव्हाण, प्रसाद गरुड, उद्धव जवंजाळ, माऊली शिंदे, विकास भोपळे, हनुमान आमले आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.