परभणी : अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली असून, हाती येत असलेल्या सोयाबीन, कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क अद्याप पूर्ववत झालेला नाही. गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांना पूर आलेला असून, पुराच्या पाण्यामुळेही नुकसान वाढत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे नुकसान वाढले आहे. दमदार पावसामुळे सोयाबीन, कापूस बहरले होते. मात्र अतिवृष्टीमुळे हे पीक बेचिराख झाले आहे. पालम, गंगाखेड, पूर्णा, पाथरी या तालुक्यांमध्ये नुकसानीचा आकडा मोठा आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. निम्न दुधना प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने दुधना नदीला पूर आला आहे तर येलदरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडून विसर्ग होत असल्याने पूर्णा नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक असल्याने बुधवारीही पूरस्थिती होती.
दरम्यान, प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम हाती घेतले असून, बुधवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची आकडेवारी अंतिम झाली नव्हती. मात्र त्या त्या तालुक्यातून मिळालेल्या माहितीनुसार नुकसानीचा आकडा १ लाख ७५ हजार हेक्टरपेक्षाही अधिक आहे.
दोघांचा मृत्यू; ८१ जनावरे दगावली
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे १२७ गावे बाधित झाली आहेत. मानवत तालुक्यात पोहंडूळ येथे योगेश आनंदराव धापटे (२७) आणि गंगाखेड तालुक्यातील सायाळा येथे सुधाकर शेषेराव सूर्यवंशी (४७) या दोघांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला. मोठे १९ आणि लहान ७२ असे ८३ जनावरे दगावली आहेत. तर १ हजार ६१ कच्च्या घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे.