- मारोती जुंबडेपरभणी : पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला रस्ता मिळावा, यासाठी ग्रामस्थ २३ सप्टेंबरपासून आंदोलन करत आहेत. यात पहिल्या दिवशी गाव विक्रीला काढण्यात आले. त्यानंतर थाळ्या वाजवल्या, अर्धनग्न आंदोलनही झाले. बुधवारी तर चक्क ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाचा निषेध करत चिखलात लोटांगण घातले. मात्र, तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून जमिनीत लोळा की गाव विका आम्ही तुमच्या समस्या सोडविण्यास बांधील नसल्याचा संदेश देण्यात येत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा महामार्गावर खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागातील रस्ते चक्क पाणंद रस्ते बनलेत. अशातच पूर्णा तालुक्यातील माहेर गावाला जोडणारा तीन किमीच्या रस्त्यावर गुडघ्याइतका चिखल तयार झाला आहे. या चिखलातून रस्ता काढत पूर्णा व परभणी शहर गाठण्यासाठी ग्रामस्थांना कसोशीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे ग्रामस्थांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ सप्टेंबरला तहसील व जिल्हा प्रशासनाला एक निवेदन देऊन चक्क बोलीद्वारे गावच विक्री काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तरी प्रशासन जागे होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गावात धडकेल आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, प्रशासन वेळेत कोणत्याही समस्यांची दखल घेईल, असे परभणी जिल्ह्यात क्वचित पाहावयास मिळते. तर दुसरीकडे ५०० लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये २०० ते २५० मतदार असतील, त्यामुळे या मतदारांनी मतदान केले काय? आणि नाही केले काय? याच विचाराने लोकप्रतिनिधीही त्या गावातील ग्रामस्थांच्या समस्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यास पुढे येत नसतील. त्यामुळेच माहेर ग्रामस्थांना तुम्ही जमिनीवर लोळा की गाव विका आम्ही मात्र तुमच्या समस्या सोडविण्यास बांधील नसल्याचा संदेश प्रशासन व लोकप्रतिनिधींतून दिला जातो की काय? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.
जिल्ह्यासाठी भूषणावह नाहीमाहेर ग्रामस्थांनी रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी सहा दिवसांपूर्वी गाव विक्रीला काढण्याचे निवेदन प्रशासनाला दिले. मात्र, तरीही प्रशासनाने या गावच्या ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे केवळ रस्त्यासाठी गाव विक्री काढणे, हे जिल्ह्यासाठी तरी भूषणावह नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहेत.