पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
सोनपेठ : तालुक्यातील ग्रामीण भागात विविध गावांमधील हातपंप बंद पडले आहेत. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यामुळे शहरातील हातपंपाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. असे असताना याकडे जि.प.चे दुर्लक्ष झाले आहे.
गंगाखेड-परभणी रस्त्याचे काम संथ
गंगाखेड: गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील ठिकठिकाणच्या पुलांची कामे रखडली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.
सिमेंट काँक्रिटचे काम थांबले
परभणी : जिंतूर-परभणी या महामार्गाचे सिमेंट क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, संबंधित मशीनमध्ये मागील आठ दिवसांपासून बिघाड झाल्याने हे काम थांबले आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांना मास्कचा पडतोय विसर
देवगावफाटा : कोरोनामुळे जवळपास आठ महिने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता हे जनजीवन पूर्वपदावर येत असताना, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वापरात येणारे मास्क घालण्यास नागरिक कानाडोळा करीत असल्याचे सेलू शहरातील रस्त्यावर दिसून येत आहे.
बँकेतील गर्दी धोकादायक
सेलू : शहरातील राष्ट्रीयकृत व खासगी बँकांमध्ये पैसे भरणे व काढण्यासाठी नागरिकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँकांकडून उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्याचबरोबर, बँकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेले सॅनिटायझर दिसून येत नाहीत. सोशल डिस्टन्सलाही फाटा दिला जात आहे.