सेलू तालुक्याची लोकसंख्या जवळपास १ लाख ६५ हजारांच्या घरात आहे.यामध्ये ९५ गावांचा समावेश आहे. तसेच येथील शैक्षणिक, व्यापार व दळणवळणाची परिस्थिती पाहता पाथरी आगाराकडून होणारी बससेवा सातत्याने कोलमडत आहे. वालूर, सातोना, आष्टी, देऊळगाव गात, डासाळा, वजळा, पाथरी, परभणी या मार्गावरील बस नियोजन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. प्रवाशांना दोन तास बसच्या प्रतीक्षेसाठी ताटकळत बसावे लागते. मागील आठवड्यात पिंप्रुळा व राजवाडी या दोन ठिकाणी विद्यार्थ्यांची बस रोखून धरली होती. सेलू तालुक्यातील बससेवेचे काम पाथरी आगारातून पाहिले जाते. त्याचबरोबर पाथरी आगारातून नेहमीच सेलूसाठी अपेक्षित बस पाठविल्या जात नाहीत. शिवाय नादुरुस्त बस या सेलूकरांच्या माथी मारल्या जातात. त्यामुळे सेलूकरांना पाथरी आगाराकडून सापत्न वागणूक मिळत आहे. शैक्षणिक, व्यापार व दळणवळणाचा विचार करून सेलू येथे बस आगार होणे गरजेचे आहे. सेलूकरांची या आगरासाठी मागील अनेक दिवसांपासून विशेषत:या आगारासाठी सर्व भौतिक सुविधा बसस्थानक परिसरात अनुकूल आहेत. त्यामुळे तातडीने पावले उचलत परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाने सेलू येथे आगारासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मागील २८ वर्षांपासून सेलूकरांना प्रतीक्षा असलेल्या बस आगाराची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.
१५ गावांत पोहोचलीच नाही बस
सेलू तालुक्यात सोन्ना, बोरगाव, सेलवाडी, गणेशपूर, बोरकिनी, गीरगाव, माले टाकळी, म्हाळसापूर, गोहेगाव, गुळखंड, सिमणगाव, आडगाव, निरवाडी, सावंगी या पंधरा गावात अद्यापही बस पोहोचली नाही. त्यामुळे सेलू येथे बस आगाराची निर्मिती झाल्यास या गावांमध्ये बस पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पादनात भर पडू शकते.
विद्यार्थ्यासाठी बस ठरतेय गैरसोयीची
सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी व विद्यार्थिनी दहावीपासून ते उच्च शिक्षण घेण्यासाठी सेलू शहराकडे धाव घेतात. परंतु, विद्यार्थी व विद्यार्थिनींची ये-जा करण्याची मदार ही बसवर अवलंबून आहे. मात्र पाथरी आगारातून सेलू येथील बसचे नियोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. अनेक वेळा निपाणी टाकळी, पिंप्रुळा, राजवाडी यासह आदी गावांतील विद्यार्थ्यांना बस रोखून धराव्या लागल्या आहेत.