शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकात एस.टी. बसने प्रवेश करताच धुळीचे थर उडत आहेत. यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता बळावली आहे. प्रवाशांच्या लक्षात येण्यासाठी स्थानकात फलाटांवर शहरांची नावे असलेले फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, फलाट क्रमांक-१ वरील गावांच्या नावांचा फलक गायब झाला आहे. बसस्थानकात बस थांबण्यासाठी सहा फलाट उभारण्यात आले होते. मात्र, बसचालक आपली बस फलाटावर न लावता १०० फूट दूरच उभी करतात. यामुळे वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले यांना दूरवर जाऊन बसमध्ये चढावे लागते. घाईगडबडीत अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असल्याने बसस्थानकातील फलाट नावालाच असल्याचे दिसून येत आहे. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी सिमेंटचे बेंच आहेत. या ठिकाणीही अस्वच्छता दिसून येते. रात्री बसस्थानकात केवळ एकच फोकस लावण्यात आलेला आहे. पुरेशी वीजव्यवस्था नसल्याने यासाठी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर प्रवासी शोधूनही सापडत नाहीत.
वेळापत्रक गायब
प्रवाशांना प्रवास करण्यासाठी एसटी बसच्या येण्याजाण्याच्या वेळा माहीत हव्यात, या उद्देशाने प्रत्येक बसस्थानकात गाड्यांचे वेळापत्रक लावले जाते. मात्र, मानवत येथील बसस्थानकात असे वेळापत्रक लावले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोणती बस किती वाजता आहे, याची माहिती प्रवाशांना मिळत नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राजकीय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष
प्रवाशांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असताना तालुक्यातील विविध पक्षांचे, संघटनांचे राजकीय पुढारी मात्र या बसस्थानकाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. सेवासुविधा मिळत नसल्याबाबत कुणीच आंदोलन करीत नसल्याने संबंधित विभागही गंभीरपणे अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही.