महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचा रखडलेला दोन महिन्यांच्या पगार आणि इतर प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच उपमहापौर भगवान वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या वेळी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन २५ सप्टेंबरपर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन उपमहापौर भगवान वाघमारे यांनी दिले. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगाचा सुधारित प्रस्ताव २० सप्टेंबर रोजी शासनास पाठविला आहे. १२ व २४ वर्षांची पदोन्नती माहे ऑगस्टच्या पगारात दिली जाईल, सफाई कामगारांना १२ व २४ वर्षांच्या पदोन्नतीसाठी जात पडताळणीची अट रद्द करण्यात येईल, वार्षिक वेतनवाढ तत्काळ दिली जाईल आदी मागण्या मान्य करून लेखी पत्र संघटनेला देण्यात आले. त्यामुळे संघटनेने पुकारलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या बैठकीस उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह आयुक्त देवीदास पवार, उपायुक्त देवीदास जाधव, स्थायी समितीचे सभापती गुलबीर खान, माजी सभापती रवी सोनकांबळे, साहाय्यक आयुक्त महेश गायकवाड, माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख, राजेभाऊ मोरे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे, अनसूयाबाई जोगदंड, के.के. भारसाकळे, पिराजी हत्तींअंबिरे, बाशिद भाई आदींची उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निघाला तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:20 AM