गंगाखेड (परभणी ) : शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळील शेत शिवारात घडली. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे.
गंगाखेड रेल्वे स्थानकाजवळील शेत सर्व्हे नंबर २३० मधील शेतीची दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी मोजणी करून आज दि.५ जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भुमी अभिलेख कार्यालयातील भुमापक अधिकारी एस.पी. लाटे, श्री. साळवे व पोलीस कर्मचारी पो.शि. मुक्तार पठाण, खंडेराय राऊत या कर्मचाऱ्यांनी नारायणराव यादव यांच्या शेतीची हद्द निश्चित करुन दिली. शेतीची हद्द निश्चित करण्यासाठी आलेले भुमापक अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी शेतातून निघुन गेल्यानंतर दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास नारायणराव यादव यांच्या भाऊकितील काही जणांनी शेतात येऊन शेतात असलेल्या १) ज्ञानोबा नारायणराव यादव वय ४० वर्ष, २) बाळु सुभाषराव यादव वय २८ वर्ष, ३) किशनराव दत्तराव गिराम वय ५८ वर्ष, ४) भागीरथीबाई किशनराव गिराम वय ४५ वर्ष सर्व रा. गंगाखेड ५) बालाजी नरहरी आम्ले वय ५५ वर्ष, ६) सरस्वतीबाई बालाजी आम्ले वय ४५ वर्ष, ७) दिपक बालाजी आम्ले वय २६ वर्ष रा. किनगाव ता. अहमदपुर जि. लातुर. यांच्यावर मिरची पावडर टाकुन लोखंडी गज व कुऱ्हाडीने मारहाण करुन जखमी केले.
दुपारी दिड वाजेच्या सुमारास सर्व जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील बालाजी नरहरी आम्ले व भागीरथीबाई किशनराव गिराम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने येथे प्रथमोउपचार करून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातुन पोलीस ठाण्यात एम.एल.सी. पाठविण्यात आली होती. यातील जखमींना परभणी येथे हलविण्यात आले असल्याने व जवाब नोंदवील्या गेला नसल्याने रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.