परभणी : शहर हद्दीत महामार्गावर जिल्हा पोलीस दलाने सोमवार ते बुधवार या कालावधीत विशेष नाकाबंदी मोहीम राबविली. मोहिमेत पोलिसांना विविध जिल्ह्यातून चोरी गेलेली सात वाहने आढळून आली आहेत. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी स्थागुशा, शहर वाहतूक शाखा आणि पोलीस ठाणेनिहाय कर्मचारी यांच्या नियंत्रणाखाली शहरात नाकाबंदी मोहीम राबविली. तसेच शहरातून विविध ठिकाणाहून चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी नवा मोंढा, कोतवाली, नानलपेठ हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर वाहनांची कागदपत्र तपासली. नाकाबंदी दरम्यान विसावा फाटा येथे एका दुचाकीमध्ये चाकू आढळल्याने संबंधित वाहन धारकाविरुद्ध नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दुचाकी चालविताना दुचाकी मालकी हक्काबाबत कोणतेही कागदपत्र आढळून आले नाहीत, बनावट नंबर टाकून उडवाडवीची उत्तरे देणाऱ्या दोन जणांविरुद्ध नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
परजिल्ह्यातील वाहने ताब्यातकारवाईत परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, पुणे येथून चोरी गेलेली सात वाहने ताब्यात घेण्यात आली. कागदपत्र नसलेली व संशयित दहा वाहने ताब्यात घेऊन संबंधित वाहन चालविणाऱ्या इसमांकडे कागदपत्र तपासणी करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले, पि.डी.भारती, अजित बिरादार, निलेश कांबळे, बाळकृष्ण कांबळे, प्रशांत वाहुळे व कर्मचाऱ्यांनी केली.
कागदपत्र पाहूनच खरेदी कराशहरातील नागरिकांनी कोणतेही जुने वाहन खरेदी करताना त्या वाहनाच्या कागदपत्राची पडताळणी करूनच खरेदी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.