बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. गुरुवारीदेखील दिवसभर जिल्ह्यात भिज पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उकडगाव या रस्त्यावरील नाल्याचे पाणी पुलावरून वाहत असल्याने सात गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली; मात्र तोपर्यंत उकडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, पिंपळगाव आदी गावांचा संपर्क तुटला होता. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या सातही गावांमधील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता; मात्र तरीही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या पावसाची प्रशासनाने चुकीची नोंद घेतली. परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात अत्यल्प पाऊस झालेला असतानाही प्रशासनाच्या नोंदीत मात्र या मंडळामध्ये १२८.३ मिमी पाऊस दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.