परभणी : महिलेवरील अत्याचार प्रकरणात एका आरोपीस जिल्हा न्यायाधीश - २ ए. ए. शेख यांनी सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे सात वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल सोमवारी परभणी जिल्हा न्यायालयाने दिला आहे.
जिंतूर पोलिस ठाण्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये फिर्यादी महिलेने अत्याचारप्रकरणी आरोपी श्रीकिशन राणोजी घोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश नरवाडे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारात फिर्यादी, फिर्यादीची मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. जिल्हा न्यायाधीश- २ ए. ए. शेख यांनी सर्व साक्ष पुराव्याचे अवलोकन करून १० एप्रिलला आरोपी श्रीकिशन रानोजी घोडे (४७, रा. पाचेगाव, ता. जिंतूर) यास सात वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास तसेच कलम ४५० अन्वये सात वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, हा दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
यांनी पाहिले काम खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी अभियोक्ता नितीन खळीकर यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, सदाशिव काळे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.