मानवत : बनावट निविष्ठा प्रकरणात पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उटी येथून १७ लाखाचा बोगस कीटकनाशक औषध असलेली ४७ बॉक्स रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जप्त केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.
बनावट निविष्ठा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आली असून या प्रकरणात परतूर, जालना,मेहकर, औंढा नागनाथ येथून असे एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या जालन्याच्या आरोपीने मेहकर येथील किशोर आंधळे याच्याकडून बनावट निविष्ठा खरेदी केल्याचे सांगितल्यानंतर सपोनी प्रभाकर कापुरे यांच्या पथकाने १७ ऑगस्टला मेहकरला जावून कृषी केंद्रचालक किशोर आंधळे याला अटक केली होती. न्यायालयात उभे केले असता त्याला दोन वेळा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीदरम्यान किशोर आंधळेची कसून चौकशी केली असता, त्याने उटी ता. मेहकर येथील घरी बनावट कीटकनाशकांचा साठा केल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोउनि. अशोक ताठे, सिद्धेशवर पाळवदे यांच्या पथकाने रविवारी रात्री ८ वाजता आंधळे याच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत बोगस कीटकनाशक असलेले ४७ बॉक्स जप्त केले. या औषधाची किंमत १७ लाख ३० हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात पोलिसांकडून किशोर आंधळे याची कसून चौकशी सुरू असून अनेक खुलासे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कृषी केंद्र चालक पोलिसांच्या रडारवरबोगस निविष्ठा प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. या प्रकरणाच्या निगडित असलेल्या अनेक बाबी पर्यंत पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. बोगस औषधी विक्री करणाऱ्या एजंटांनी परभणी जिल्ह्यासह नांदेड, हिंगोली, जालना, बीड, यासह मानवत तालुक्यातील अनेक कृषी केंद्र चालकांना कीटकनाशक विक्रीसाठी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मानवत तालुक्यासह इतर जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र चालक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.